मुंबई – टीम इंडियाचा बॅट्समन युवराज सिंग याने एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारल्याचं तुम्ही पाहिलं असेलच. अशाच प्रकारे एका ओव्हरमधील सहा बॉल्समध्ये सहा सिक्सर मारण्याचा पराक्रम पुन्हा एकदा करणअयात आला आहे. आता हा पराक्रम केला आहे तो म्हणजे पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सागर मिश्रा याने.

बुधवारी एकिकडे सिक्सर किंग युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांचा विवाहसोहळा पार पडत होता. तर दुसरीकडे मुंबईतील सागर मिश्रा याने ६ बॉल्समध्ये ६ सिक्सर लगावले आहेत. विशेष म्हणजे सागर मिश्रा हा सुद्धा युवराज सिंग याच्याप्रमाणे डावखुरा बॅट्समन आहे.

२३ वर्षांच्या सागर मिश्रा याने ‘टाइम्स शिल्ड ब डिव्हिजन टूर्नामेंट’मध्ये पश्चिम रेल्वेतर्फे खेळताना आरसीएफ विरोधात हा पराक्रम केला आहे. नंबर चारवर बॅटिंग करण्यासाठी आलेल्या सागर मिश्रा याने आरसीएफचा ऑफ स्पिनर तुषार कुमरे याच्या एका ओव्हरमध्ये चक्क ६ सिक्सर मारत नवा इतिहास रचला.

आपल्या या धमाकेदार बॅटींगमध्ये सागरने ४६ बॉल्समध्ये ९१ रन्स पटकावले. सागरसोबतच पश्चिम रेल्वेच्या हर्षद भोजनाईकने १२२ रन्सची खेळी केली. या स्कोरमुळे टाइम्स शिल्ड ब डिव्हिजन टूर्नामेंटमध्ये पश्चिम रेल्वेने आरसीएफवर एक इनिंग आणि २४६ रन्सने विजय मिळवला.

एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारण्याचा पराक्रम यापूर्वी पाहूयात कुणी केला आहे.

इंटरनॅशनल क्रिकेट

  • हर्शल गिब्स
  • युवराज सिंग

फर्स्ट क्लास क्रिकेट

  • सर गैरी सोबर्स
  • रवी शास्त्री
  • ऐलेक्स हेल्स