जोहान्सबर्ग: भारतीय महिला हॉकी संघाला वर्ल्ड हॉकी लीग सेमीफाइनलमध्ये अर्जेंटीनाकडून पराभव स्विकारावा लागला आहे. शेवटच्या सामन्यात जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटीनाच्या संघाने भारताला 0-3ने पराभूत केले. अर्जेंटीनासाठी रोशियो सांचेस, मारिया ग्रानाटो आणि नोएल बिरियोनुएवोने अनुक्रमे दुसऱ्या, चौदाव्या आणि  25व्या मिनीटाला गोल केले. महत्तवाचे असे की, भारताला या सामन्यात एकही गोल करता आला नाही. त्यामुळे भारताचा भोपळा फुटलाच नाही.

अर्जेंटीनाने दुसऱ्याच मिनीटाला रोशियोच्या गोलच्या साथीने आघाडी घेतली. भारताची गोलकिपर सविताने सुरूवातीच्या काळात दमदार खेळी करत अर्जेंटीनाचे आक्रमन अनेकदा परतवून लावले. अर्जेंटीनाने पहिल्यांदा केलेल्या दमदार प्रयत्न सविताने उधळून लावला. पण, दुसऱ्या वेळी तिला यश आले नाही. त्यामुळे अर्जेंटीनाचा पहिला गोल झाला. पहिल्या गोलचे उट्टे काढण्यासाठी नमिता टोप्पोच्या जवळून भारताच्या वंदाना कटारियाने जोरदार आक्रमण केले. मात्र, अर्जेंटीनाच्या गोलकिपरने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. तेव्हापासून भारत मागे पडला तो पडलाच. पहिल्या 15 मिनीटांत सविताने 4 गोल परतवून लावले. (हेही वाचा, भारतीय सैन्यांवर हल्ल्यांचा निषेध म्हणून भारतीय हॉकीपटूंनी बांधल्या होत्या काळ्या फिती)

अर्जेंटीनाने पहिला पेनल्टी कॉर्नर सहाव्या मिनीटाला मिळवला. मात्र, नमिताने यावेळी गोल होऊ दिला नाही. मारिया ग्रानाटोने 14व्या मिनीटाला गोल करून अर्जेंटीनाला 2-0 अशी अघाडी मिळवून दिली. अर्जेंटीनाला 25व्या मिनिटाला पेनल्टी पेनल्टी स्ट्रोक मिळाला. जो नोएलने गोल करून सार्थकी लावला.

अर्जेंटीनाला 34व्या मिनीटाला सलग पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण, भारतीय गोलकीपर रजनी ईने तो वाचवला. हाफ टाईमनंतर सविताऐवजी गोलकिपर म्हणून रजनीने गोलकीपिंगची जबाबदारी सांभाळली. शेवटच्या क्षणापर्यंत भारताने कसून प्रयत्न केले पण, अर्जेंटीनाने भारताची डाळ शिजू दिली नाही. उद्या (मंगळवार) भारत क्वार्टर फायनलमध्ये इग्लंडविरूद्ध खेळणार आहे.