ओव्हल: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान यांच्यातील फायनल सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच युवराजने मैदानात येताच आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड कायम केलाय. आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सातव्यांदा खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. इतक्यावेळी फायनलमध्ये खेळणारा तो एकुलता एक खेळाडू आहे.

युवराजच्या आधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा त्यासोबतच महेला जयवर्धने यांच्या नावावर होता. या सर्वांनी आयसीसी फायनलच्या सहा-सहा सामन्यांमध्ये खेळ केला आहे. पाकिस्तान विरोधात मैदानात उतरताच सिक्सर किंग युवराजने सातव्यांदा अंतिम सामन्यात खेळण्याची किमया साधली.  (हे पण वाचा: पुढच्या वर्षी नाही होणार आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा, हे आहे कारण !)

एकदिवसीय कारकिर्दीत युवराजने आतापर्यंत 8622 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 37 इतकी असून त्याने आतापर्यंत 52 अर्धशतक आणि 14 शतक आपल्या नावावर केले आहेत. वन-डेमध्ये 150 धावा ही युवराजची सर्वाधिक धावसंख्या आहे. पाकिस्तान विरूद्धचा हा महामुकाबला म्हणजे युवराजचा 301 वा सामना आहे.

युवराजने 2000 मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केल्यानंतर 2000 आणि 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2003 मध्ये आयसीसी वर्ल्डकप, 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्डकप, 2014 मध्ये टी-20 वर्ल्डकपचे फायनल खेळला आहे. यातील तीन किताब त्याने जिंकलेही आहेत.