वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. ते पुन्हा एकदा मुस्लिम राष्ट्रांवर बंदी घातल्याने चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांनी यावेळी आठ मुस्लिम राष्ट्रांवर अमेरिकेत विमानाने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास बंदी घातली आहे. या ८ देशांमध्ये इजिप्त, जॉर्डन, कुवेत, कतार, अमिरात, तुर्कस्तान, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे. या आठही देशांना लॅपटॉप, आयपॅड आणि कॅमेऱ्यासह अनेक इलेक्टॉनिक वस्तू अमेरिकेत विमानाने आणण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

इजिप्त, जॉर्डन, कुवेत, कतार, अमिरात, तुर्कस्तान, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात या आठही देशांवर कोणतेही कारण न देता इलेक्टॉनिक्स वस्तू न आणण्याबाबतची बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही केवळ तात्पूरती व्यवस्था असून ही बंदी केवळ या आठही देशातून उड्डाण घेणाऱ्या विमानातील प्रवाशांवर असणार आहे, असं ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलयं. पण संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकार ही खबरदारी घेत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र या बंदीबाबत अमेरिकन सुरक्षा एजन्सींनी काहीही खुलासा केलेला नाही. विशेष म्हणजे रॉयल जॉर्डनियन एयरलाइन्स आणि सौदी अरबच्या न्यूज एजन्सीमुळे या बंदीची माहिती उजेडात आली आहे. (हे पण वाचा: McDonald चे ट्विटर म्हणते, ट्रम्प यू आर डिस्गस्टिंग)

दरम्यान, मोबाईल आणि चिकित्सेशी संबंधित उपकरणांना प्रतिबंधातून वगळण्यात आलं असल्याचं रॉयल जॉर्डेनियन या जॉर्डनच्या एयरलाइन्सने स्पष्ट केलं आहे. तर सुरक्षा विभागाचे प्रवक्ते डेव्हिड लॅपन यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मात्र काही तरी मोठा हल्ला होण्याची शक्यता गुप्तहेर संस्थांनी वर्तविली असावी, त्यामुळेच बंदीचा हा निर्णय घेण्यात आला असावा अशी शक्यता रेंड कार्पोरेशनचे सुरक्षा विशेषज्ञ ब्रायन जेनकिन्स यांनी वर्तविली.