दोहा : परदेशात जायचं म्हटलं की, व्हिसा हा सर्वात महत्वाचा घटक असतो. पण जर व्हिसाच लागणार नसेल तर अनेकांच्या भुवया उंचावतील. कतारने 80 देशातील नागरिकांना व्हिसा-फ्री एन्ट्री जाहीर केली आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. कतार सरकारने हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

भारतासह युरोपातील काही देशे तसेच लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे. 33 देशातील नागरिकांना 180 दिवस (सहा महिने) तर उर्वरित 47 देशातील नागरिकांना 30 दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल. सुरक्षा आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरुन ही विभागणी करण्यात आली आहे.

सौदी अरेबिया, इजिप्त, बहारेन आणि यूएईने 5 जून रोजी कतारवर बहिष्कार लादला होता. इराणशी जवळीक साधल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कतारशी या देशांनी वाहतुकीचे संबंध तोडले. या निर्णयामुळे कतार अत्यंत मुक्त देश म्हणून गणला जाईल, असा विश्वास कतार टुरिझम ऑथरिटीचे प्रमुख पर्यटन विकास अधिकारी हसन अल इब्राहिम यांनी व्यक्त केला.