नवी दिल्ली : येत्या २२ ऑगस्टला आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी संप पुकारणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं (UFBU) संपाची हाक दिली आहे. बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. या संपामुळे पैशांच्या देवाण घेवाण व्यवहारावर परिणाम होणार आहे. मात्र, मोबाईल बॅंकींग आणि एटीएम सेवांवर कोणताही परिणाम होणार नाहीये.

देशभरातील नऊ मोठ्या बँक युनियन या संपात सहभागी होणार असल्याची माहिती यूएफबीयूनं दिली आहे. या संपात तब्बल 10 लाख बँक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑल इंडिया बँक एप्लॉईज असोसिएशन (एआयबीईए)चे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘आम्ही आधीच संपाची नोटीस दिली आहे. येत्या 22 ऑगस्टला संपूर्ण बँकिंग सेक्टर संपात सहभागी होणार आहे.’

असोसिएशनची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचं विलीनीकरण आणि खासगीकरण थांबवणं. बँकांचं खासगीकरण थांबवा अन्यथा देशाची अर्थव्यवस्था ढासळेल. असं असोसिएशनचं म्हणणं आहे. एफआरडीआय विधेयक मागे घ्या. या प्रमुख मागण्या आहेत.