नवी दिल्ली : नोकरी बदलल्यानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ अकाऊंट नव्या कंपनीला जोडण्याची डोकेदुखी आता संपणार आहे. आता पीएफ खात्याचं ट्रान्सफर नोकरी बदलताच आपोआप होणार आहे. भविष्य निर्वाह निधीचे मुख्य आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी ही माहिती दिली.

प्रॉव्हिडंट फंड हस्तांतरण प्रक्रिया कर्मचाऱ्यांकरिता अधिक सोयीस्कर व्हावी, यादृष्टीने अनेक बदल केले जात आहेत. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) समोर सध्या मोठं आव्हान आहे ते म्हणजे मध्येच बंद होणाऱ्या पीएफ खात्यांचं. या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत.

मुख्य पीएफ आयुक्त म्हणाले, ‘नोकरी बदलली की अनेक पीएफ खाती बंद होतात. मग कर्मचारी नव्या कंपनीत आपलं अकाउंट नव्याने उघडतात. पण आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचं केल्यानं हे खातं बंद होणार नाही. पीएफ हे एक कायमस्वरुपी खातं आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एकच खातं असणं केव्हाही चांगलं. आता जर कोणी नोकरी बदलली तर अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील. जर कर्मचाऱ्याकडे आधार आयडी आणि वेरिफाइड आयडी असेल तर तो देशात कुठेही नोकरीसाठी गेला तरी त्याचं पीएफ खातं ट्रान्सफर होईल. ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे.’