कंट्रोव्हर्सी क्वीन एक्ट्रेस पायल रोहतगी हिच्या (Actress Payal Rohatgi Arrested) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) पायला एका प्रकरणात अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला अश्लिल शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा पायलवर आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोसायटीतील इतर सदस्यांवर खोट्या केसमध्ये अडकवण्याची तिनं धमकी दिल्याचं समजतं.

मिळालेल्या माहितीनुसार, पायलच्या वडिलांनी 4-5 वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील सुंदरबन एपिटॉम सोसायटीत घर विकत घेतलं होतं. तेव्हापासून पायल आणि सोसायटीतील सदस्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यात सोसायटीची सदस्य नसतानाही पायल गेल्या 20 जून रोजी झालेल्या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होती. सोसायटीच्या सदस्यांनी तिच्यावर आक्षेप घेतला होती. तिला सभेत बोलू दिलं नाही. त्यामुळे पायल संतापली आणि तिनं सभेत अश्लिल शिवीगाळ करत सोसायटीच्या चेअरमनला जिवे मारण्याची धमकी इतर सदस्यांना देखील तिन खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली, असं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

‘हा’ आहे वादाचा मुद्दा…

पायल घरात किंवा सोसायटीच्या आवारात कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवू शकत नाही, ही अट सोसायटीच्या सदस्यांनी घातली होती. त्यांच्या अटीला न जुमानता पायल सोसायटीत व्हिडिओ बनवत होती. सोसायटीचे सदस्य तिला वारंवार रोखत होते. त्याचबरोबर सोसायटीच्या सदस्यांनी पायलच्या कुटुंबीयांना विकास शुल्क म्हणून 5 लाख रुपयांची मागणी केली होती. यावरून हा वाद झाल्याचं समजतं. पोलिसांनी पायलला कोणताही समन्स न बजावता तिला शुक्रवारी सकाळी अटक केल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पायल रोहतगीला अटक होण्याची ही पहिली वेळ नागी. या आधी देखील ती अनेकदा वादात अडकली होती. सन 2019 मध्ये तर नेहरू-गांधी घराण्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी पायलला राजस्थानात अटक झाली होती. इतकंच नाही तरकोर्टानं तिची रवानगी कोठडीत देखील केली होती. नंतर तिची जामिनावर सुटका झाली होती. पायल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. मात्र, चर्चेत राहण्यासाठी ती वाद ओढवून घेत असते.