one-act-play

मराठी रंगभूमीच्या प्रागतिकतेचा मापदंड म्हणून ओळखली जाणारी एकांकिकांची चळवळ केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगात जिथे जिथे म्हणून मराठी भाषा बोलली जाते तिथे अस्तित्वात आहे. जवळपास १०० स्पर्धांमधून ३००० ते ४००० एकांकिका दरवर्षी सादर होतात, त्यावर चर्चा होते, प्रसारमाध्यम त्यावर विशेष कार्यक्रम करतात, वर्ष संपते, लक्षणीय कलाकार, लेखक, दिग्दर्शक व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपटांमध्ये स्थिरावतात आणि नंतर फक्त आठवणी उरतात. काही वर्षानंतर त्या एकांकिकेचा दृश्य स्वरूपातला कुठलाही संदर्भ केवळ शब्दात मांडता येतो कारण त्या एकांकिकेचे साधे चित्रीकरणही कोणी केलेले नसते. नेमकी हीच कोंडी फोडण्यासाठी एकांकिकांचे सादरीकरण जपून ठेवण्यासाठी, त्याचे दस्तऐवजीकरण अर्थात रेकॉर्ड ठेवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रयोगशील नाट्यसंस्था ‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाईड’ या संकेतस्थळाने ‘ई -नाट्यशोध ऑनलाइन एकांकिका स्पर्धा’ गेल्या वर्षीपासून सुरु केली. पहिल्याच वर्षी त्याला दमदार प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यंदा दक्षिण भारतातली जेट पॅक ही अभिनेता मोहनलाल आणि जोस थॉमस यांची नाट्य गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी संस्था या उपक्रमात सहभागी झाली आहे.

ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या चार भाषेत ही स्पर्धा होणार आहे. जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर एकांकिका गुणवत्तेचा कस लागेल. विशेष म्हणजे स्पर्धेपलीकडे जाऊन हा प्रकल्प नव्या दमाच्या सर्व स्पर्धकांना आर्थिक लाभ सुद्धा देणारा आहे, यु ट्यूबवर जितके प्रेक्षक एकांकिका पाहतील तितके मिळणारे अर्धे उत्पन्न सर्व स्पर्धकांना देण्यात येईल. कुठल्याही प्रकारचा प्रवेश फी नसलेली ही स्पर्धा असून स्पर्धकांनी आपली रेकॉर्ड केलेली एकांकिकेची सीडी आणि स्क्रिप्टची एक प्रत ई-नाट्यशोधला सबमिट करायची आहे…एकांकिका स्पर्धा ऑन लाइन असल्याने त्याला नेट प्रेक्षक पसंतीची पारितोषिक असतीलच पण त्याच बरोबरीने मान्यवर परीक्षकांचे मंडळ या एकांकिकांचे परीक्षण करेल. यातून विजेत्या ठरणाऱ्या एकांकिकांचे रंगमंचीय प्रयोग ‘अस्तित्व’तर्फे करण्यात येतील.

या संदर्भात अधिक माहिती देताना ‘अस्तित्व’चे प्रमुख आणि ऑन लाइन स्पर्धेची मूळ संकल्पना आणणारे रवि मिश्रा म्हणाले कि राष्ट्रीय पातळीवरच्या नाट्यमहोत्सवांमध्ये ध्वनीफितीच्या स्वरूपात येणारे मराठी नाटक तंत्रदृष्ट्या फारच कमकुवत असते,त्यामुळे त्यांची निवड होऊ शकत नाही, ही परिस्थिती बदलावी आणि मुळातच नव्या रंगकर्मींना आपण करत असलेले काम उत्तमरीत्या जपून ठेवायची सवय लागावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई –पुण्याच्या ५००-१००० प्रेक्षकांमध्ये अडकलेली एकांकिका जागतिक स्तरावर पोहोचावी आणि त्याचे पुढच्या पिढ्यांसाठी दस्तऐवजीकरण व्हावे या हेतूने ही स्पर्धा भरवली जात आहे. एकांकिकेचे वाढते बजेट, लांबचा प्रवास, कलाकारांची सुरक्षितता अश्या मुलभूत अडचणींचा सामना करणाऱ्या स्पर्धकांनाही हा सर्वात सोपा पर्याय आहे.प्रत्येक एकांकिकेखाली त्या एकांकिकेच्या प्रतिनिधीचा क्रमाक दिला जाईल जेणेकरून निर्मिती संस्थांना नाटके, मालिका, चित्रपट क्षेत्रातल्या कामाच्या संधी करिता त्यांना संपर्क करणे सोप्पे जाईल.या स्पर्धेच्या चाळणीतून तावून –सुलाखून आलेले विजेते प्रयोग प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होणार असल्यामुळे या प्रयोगांची दृश्य रंगभूमीशी असलेली नाळ टिकणारी आहे. असे मिश्रा म्हणाले.

स्पर्धेसाठी एकांकिका सादर करण्याची अंतिम तारीख २ मे २०१५ असून अधिक माहिती www.enatyashodh.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकांकिका क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवणाऱ्या या स्पर्धेबद्दल सध्या नाट्यक्षेत्रात विशेष उत्सुकता आहे.