Top Recommended Stories

Lata Mangeshkar Dead: लतादीदींच्या निधनानं संगीत क्षेत्रासह देशाचं मोठं नुकसान, राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी वाहिली श्रद्धांजली!

Lata Mangeshkar Dead : लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच कलाक्षेत्रासह राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे

Updated: February 6, 2022 1:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

India Pays Tearful Tributes to Lata Mangeshkar As She Dies at 92
India Pays Tearful Tributes to Lata Mangeshkar As She Dies at 92

Lata Mangeshkar Dead : गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांचे रविवारी सकाळी निधन झाले आहे. त्या 92 वर्ष्यांच्या होत्या. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते. लतादीदींची तब्येत अचानक खालावली आणि त्यांची प्राणज्योत (Lata Mangeshkar dies) मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच कलाक्षेत्रासह राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर (Lata Mangeshkar dead) पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Also Read:

You may like to read

लतादीदींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. लतादीदींच्या निधनानं संगीत क्षेत्रासह देशाचं मोठं नुकसान झाले असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील ट्वीट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘जिंदगी प्यार का गीत है,म्हणत हजारो गीतांना आपला सुमधुर आवाज देणाऱ्या,देशाचा आवाज म्हणून ओळख असणाऱ्या भारतरत्न लता दीदी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. दीदींनी अजरामर केलेला संगीताचा अनमोल ठेवा माझ्यासह कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती. लतादीदींनी भारतीय संगीत समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

‘लता दीदी नावाच्या युगाचा अंत झाला, जगाच्या पटलावर हिंदुस्थानचे वैभव लतादीदी होत्या. लता दीदींचे जाणं अत्यंत वेदनादायी, दुःखद आहे. आता केवळ लता दीदींच्या आवाजासोबत राहावे लागेल, असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. ‘लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.’, असे त्यांनी म्हटलं आहे.

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग यांनीही लतादीदींना श्रद्धांजली दिली आहे. सहवाग यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘द नाईटिंगेल ऑफ इंडिया, एक आवाज ज्याने जगभरातील लाखो लोकांना आनंद दिला. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी मनःपूर्वक संवेदना. ओम शांती…’

साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी लतादीदींच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. चिरंजिवी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, ‘भारताची गानकोकिळा… लतादीदी महान व्यक्तिमत्वांपैकी एक…लता दीदी आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जीवनप्रवास विलक्षण होता. त्यांचा आवाज आणि गाणं कायम मनात स्थान करुन राहील.’

झी ग्रुपचे फाऊंडर सुभाष चंद्र यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘लतादीदींचे पार्थीव पंचत्वात विलीन होणार आहे. पण माझे फक्त म्हणणे नाही तर माझा ठाम विश्वास आहे की त्या कधीही मरणार नाही. दीदी त्यांच्या आवाजाने चिरंतन जगतील. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी माझ्या संवेदना व्यक्त करतो.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 6, 2022 10:37 AM IST

Updated Date: February 6, 2022 1:01 PM IST