मुंबई : ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार (Marathi Writer Jayant Parwar) यांचे निधन झाले आहे. जयंत पवार यांना शनिवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. जयंत पाटील यांच्या पाश्चात पत्नी पत्रकार-लेखिका संध्या नरे (Sandhya nare) आणि मुलगी असा परिवार आहे.

जयंत पवार (veteran writer Jayant Pawar) यांनी लिहिलेली नाटके खूप गाजली. त्यांनी आपल्या नाटकांनी तसेच कथांनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला होता. पवार यांचा ‘फीनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ (Lalbaug-paral Movie) हा मराठी चित्रपट तयार करण्यात आला आहे. तसेच ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा (Rajjo Movie) हिंदी चित्रपट तयार करण्यात आला आहे. 2014 ला जानेवारीमध्ये महाड येथे झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (kokan Marathi Sahitya Parishad) साहित्य संमेलनाचे (Sahitya Sammelan) जयंत पवार हे अध्यक्ष होते.

‘अधांतर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ (दीर्घांक), ‘दरवेशी’ (एकांकिका), ‘पाऊलखुणा’ (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ (कथासंग्रह), ‘बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक’ (भाषाविषयक), ‘माझे घर’, ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ (कथासंग्रह), ‘वंश’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे’ (दीर्घांक), ‘होड्या’ (एकांकिका) याचे लेखन त्यांनी केले होते. या कलाकृती लक्षात राहण्या सारख्या आहेत.

जयंत पवार यांनी ‘वंश’, ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ अशी नाटके केली आहेत. तसेच 15 एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. ‘कार्य सिद्धीस जाण्यास समर्थ आहे’, ‘होड्या’, ‘घुशी’ या त्यांच्या एकांकिकेचे शेकडो प्रयोग झाले आहेत.