लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक धमाकेदार निर्णय घेत आहेत. आता योगी यांनी उत्तर प्रदेशात नवविवाहीत जोडप्याला एक खास आहेर देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा लग्नात मित्राने गंमत म्हणून कंडोमचं पाकिट दिल्याची घटना तुम्ही पाहिली किंवा ऎकली असेल. मात्र आता यूपी सरकारने कुटुंब नियोजनासाठी राज्यातील प्रत्येक नवविवाहीत जोडप्याला त्यांच्या लग्नात एक ‘शगुना’चं किट देणार आहेत. या किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या असतील.

राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेला शगुन असं नाव देण्यात आलं आहे. ‘शगुन’ म्हणून दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये आरोग्य विभागाचं एक पत्रही असणार आहे. या पत्रात कुटुंब नियोजनाचे फायदे लिहिलेले असतील. ‘हम दो, हमारे दो’ चा संदेश देत कुटुंबाची संख्या 2 मुलांपर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठी या योजनेमार्फत प्रोत्साहन देण्यात येणार आहे. येत्या 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ होईल.

मिशन परिवार विकासचे प्रकल्प व्यवस्थापक अविनाश सक्सेना यांनी माहिती देताना सांगितले, ‘आपत्कालीन परिस्थितीत वापरायच्या गर्भनिरोधक गोळ्या, सामान्य गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम या किटमध्ये असतील. आरसा, कंगवा, रुमाल, टॉवेल्स अशा निरोगी आरोग्यासाठी आवश्यक वस्तूही या किटमध्ये असतील. गर्भनिरोधक साधने कशी वापरायची आणि या साधनांचे फायदे यासंदर्भात पडणाऱ्या प्रश्नांसंबंधीएक पुस्तिकाही असेल. मात्र जी जोडपी निरक्षर असतील, त्यांना आशा सेविका ही माहिती स्वत: सांगतील.