नवी दिल्ली : डोकलाम वादावर तोडगा निघाल्यावर सध्यातरी भारत-चीन सीमेवर शांतता आहे. असे असले तरी, चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांसोबत एकाच वेळी भारताचे युद्ध होण्याची अद्यापही शक्यता आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीच याबाबत एक वक्तव्य केले आहे. बिपीन रावत यांनी म्हटले आहे की, येत्या काळात भारताला दोन्ही आघाड्यांवर लढावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. रावत यांनी म्हटले आहे की, भारताला उत्तरेकडून चीन आणि पश्चिमेकडून पाकिस्तानकडून युद्धाचा धोका आहे. डोकला वाद निवळून एक आठवडाच उलटत आहे. तोवरच रावत यांनी हा इशारा दिल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. उत्तरेकडील बाजूल चीनने आपली ताकद दाखवने सुरू केले आहे. ‘सलामी स्लाइसिंग’ म्हणजेच भूभागावर हळूहळू कब्जा करणे तसेच, सतत दुसऱ्याच्या ताकतीचा अंदाज घेत राहणे ही चीनची वृत्ती चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारताला सतत सतर्क रहावे लागणार असल्याचेही रावत यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना रावत यांनी म्हटले आहे की, भारत-चीन ताणलेल्या संबंधाचा पुढे जाऊन पाकिस्तानही फायदा उठवण्याचा प्रयत्न करू शकतो. महत्त्वाचे असे की, लष्करप्रमुखांनी हा इशारा पहिल्यांदाच इशार दिला नाही. यापूर्वीही त्यांनी हा इशारा दिला आहे. लष्करप्रमुखांचा इशारा हेच सांगत आहे की, भारत चीनच्या आगळीकीवर किती संवेदनशील आहे.