नवी दिल्ली – बँकेच्या संबंधित तुमची काही कामं असतील तर ती सोमवारी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी पूर्ण करुन घ्या. सोमवारी तुम्ही बँकेची कामं पूर्ण केली नाही तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. कारण, २२ ऑगस्टला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचा-यांच्या युनियन्सने संपाची हाक दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून संप जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्व बँक मंगळवारी बंद राहण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि बँकांचे विलीनीकरण व एकत्रिकरणाला फोरमचा विरोध आहे. या संपात देशभरातील बँकांच्या १ लाख ३२ हजार शाखांमधील एकूण १० लाख बँक कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

बँक कर्मचा-यांच्या या संपामुळे पैशांच्या देवाण घेवाण व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, मोबाईल बॅंकींग आणि एटीएम सेवांवर कोणताही परिणाम होणार नाहीये. तुम्हालाही बँकेच्या संबंधित काही काम करायचं असेल तर ते सोमवारीच पूर्ण करा नाहीतर संपाचा फटका तुम्हालाही बसू शकतो.