मुंबई: सप्टेंबर महिन्याची सुरुवात महागाईच्या झटक्यानं झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ (LPG Price Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. 14.2 किलोच्या अनुदानीत LPG सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल सिलिंडर 75 रुपयांनी महागला आहे.

25 रुपयांनी महागला LPG सिलिंडर

मुंबईत 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलिंडरसाठी आता 884.50 रुपये मोजावे लागणार आहेत. आधी हा दर 859.50 रुपये होता. देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलिंडरची किंमत आता 884.50 रुपये झाली आहे. आधी गॅस सिलिंडर 859.50 रुपयांना मिळत होता. या आधी पेट्रोलियम कंपन्यांनी 17 ऑगस्ट रोजी LPG सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती. तर 1 जुलैला LPG सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
दुसरीकडे, कोलकात्यात LPG सिलिंडरची किंमत 886 रुपये होती. आता सिलिंडर 911 रुपयांत मिळणार आहे. चेन्नईमध्ये LPG सिलिंडरची किंमत 900.50 रुपये झाली आहे. कालपर्यंत हा दर 875.50 रुपये होता. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ग्राहकांना LPG च्या एका सिलिंडरसाठी आता 897.5 रुपये मोजावे लागणार आहे. तर गुजरातमधील अहमदाबादमध्ये LPG सिलिंडर 866.50 रुपयांत मिळेल. भोपाळमध्ये कालपर्यंत 840.50 रुपयांत मिळणारा सिलिंडर आता 865.50 रुपयांत मिळणार आहे.

कमर्शियल सिलिंडर देखील महागला…

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसोबतच कमर्शियल गॅस सिलिंडर देखील महागला आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 75 रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी 17 ऑगस्टला कमर्शियल सिलिंडरच्या दरात 68 रुपयांनी वाढ झाली होती. दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1618 रुपये होती. आता त्यासाठी ग्राहकांना 1693 रुपये मोजावे लागणार आहे.

14.2 किलो LPG सिलिंडरचे दर…

शहर              जुने दर                   नवे रेट 
दिल्ली              859.50                    884.5
मुंबई               859.50                     884.5
कोलकाता        886                          911
चेन्नई               875.50                      900.5
लखनऊ           897.5                       922.5
अहमदाबाद      866.50                     891.5
भोपाळ             840.50                     890.5

यंदा 190.50 रुपयांनी महागला LPG सिलिंडर

सन 2021 च्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारीपासून आतापर्यंत LPG गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 190.50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत LPG सिलिंडरची किंमत 694 रुपये होती. ती फेब्रुवारीमध्ये 719 रुपये प्रति सिलिंडर झाली होती. 15 फेब्रुवारीला त्यात आणखी वाढ झाली होती. सिलिंडरची किंमत 769 रुपये झाली. 25 फेब्रुवारीला LPG सिलिंडरचा दर प्रति सिलिंडर 794 रुपये करण्यात आला. मार्च महिन्यात सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली. प्रति सिलिंडरची किंमत 819 रुपये झाली. मात्र, एप्रिलमध्ये LPG सिलिंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली. दिल्लीत 809 रुपये झाली होती. याचा अर्थ असा की, सन 2021 च्या सुरुवातीपासून LPG सिलिंडरच्या दरात 190.50 रुपये वाढ झाली.