गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण. काहीतरी करून दाखवण्याची आमच्यासाठी ती संधी असते. त्यामुळे दोन महिन्यांपासून आम्ही जोमाने गणपतीच्या तयारीला लागतो. तरुणांच्या कलागुणांना वाव हेच मंडळाचे वैशिष्टय़… त्या दृष्टीने गणेशोत्सव हे या नवख्या कलाकारांसाठी चांगलं व्यासपीठच ठरतं. यंदा आम्ही प्राचीन शंकराचं मंदिर साकारणार आहोत. गेले तीन-चार दिवस तर आम्ही रात्री तीन-तीन वाजेपर्यंत इथे असतो. आम्ही कोणालाच कॉण्ट्रक्ट देत नाही. कारण हीच तर वेळ असते आम्हाला आमच्यातील कला दाखवण्याची… येथे प्रत्येकजण आपापले विचार मांडतो आणि शेवटी विषय निवडतो… आणि मग प्रत्येकाला त्यांची कामे वाटून दिली जातात. गेली पाच वर्षे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर डेकोरेशन करतोय. त्याचं काय आहे ना, बाप्पाच्या सेवेत वेळ कसा जातो ते कळतच नाही. आम्हाला ते दहा दिवस एका धाग्यात बांधून ठेवतो.