मुंबई: विवाहित म्हणजे सुवासिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला (vatpoornima) खूप महत्व असते. ज्येष्ठ पौर्णिमा (Jyeshtha Purnima) ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सावित्रीने (Savitri) यमदेवांकडून (Yum) आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली होती. तेव्हापासून पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचारतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवाने सत्यवानाला (Satyavan) आयुष्य परत दिले. त्यामुळे सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात. आज वटपौर्णिमा आहे. कोरोना (Coronavirus) संकटाच्या काळामध्ये सर्व महिलांनी घरीच राहून वटसावित्री व्रताचरण करुन पूजन करावे, असे आवाहन केले जात आहे.

वटसावित्रीची कथा –

पौराणिक कथेनुसार, भद्र नावाच्या राज्यात अश्र्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वत:चा पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. शाल्व नावाच्या राज्यात धृमत्सेन नावाचा अंध राजा राज्य करत होता. सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता.

धृमत्सेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्षांचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पत्र सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले. लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू-सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करु लागली.

एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात. पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते.

अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले. तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तू म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.