वाराणसी:  हायड्रोजन ऊर्जा आणि नॅनो सायन्ससाठी (Hydrogen Energy and Nano Science) देशातच नव्हे तर जगात किर्ती मिळवलेले वाराणसी हिंदू विद्यापीठातील (BHU) भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक, पद्मश्री ओंकारनाथ श्रीवास्तव (Padmashri Prof Onkarnath Srivastava) यांचं कोरोनामुळे निधन झालं.

वृत्तसंस्था ‘आयएएनएस’नुसार, 79 वर्षीय ओंकारनाथ श्रीवास्तव हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावर सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये 20 एप्रिलपासून उपचार सुरू होते. दरम्यान, रविवारी रात्री उशीरा ओंकारनाथ श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली. दोन आठवड्यांपूर्वी रिसर्च स्कॉलर अभय जयसवाल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे प्रोफेसर श्रीवास्तव खूप दु:खी झाले होते. भारत आणि दक्षिण आशियाचे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हायड्रोजन एनर्जीचे उपाध्यक्ष होते.

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्राध्यापक ओंकारनाथ श्रीवास्तव यांना पद्मश्रीसोबतच विज्ञानातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार शांति स्वरूप भटनागर, होमी जहांगीर भाभा सम्मान, औद्योगिक विभागाचा नॅशनल रिसर्च अवॉर्डसह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात आलं होतं. प्राध्यापक श्रीवास्तव इस्त्रोसाठी (ISRO) ‘सुपर फ्यूअल’ स्टोरेज पाठवण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याआधीच श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला.


प्राध्यापक ओंकारनाथ श्रीवास्तव यांनी सुपर फ्यूअल स्टोरेज विकसित केलं होतं. या सुपर स्टोरजमध्ये इंधन कार्बन एअरजेलच्या रूपात साठवलं जाते. जे रॉकेटमध्ये वापरण्यात येणारे लिक्विड हायड्रोजन शोषून घेते आणि संग्रहित करते. या तंत्रज्ञानाद्वारे, अंतराळ मोहिमांमध्ये लांब पल्ल्याच्या रॉकेटची गती आणि सामर्थ्यामध्ये अनेक पटींनी वाढ करण्याचा दावा केला जात होता.

वाराणसीत चावणार होते हायड्रोजन ऑटो रिक्षा

प्राध्यापक ओंकारनाथ श्रीवास्तव यांनी नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मल्टीपर्पज फिल्टरची निर्मिती केली होती. गेल्या 2 महिन्यांपूर्वीच प्रा. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात नॅशनल हायड्रो पावर कॉर्पोरेशन आणि बीएचयूच्या हायड्रोजन एनर्जी सेंटरमध्ये एका महत्त्वपूर्ण करार झाला होता. त्यामाध्यमातून वाराणसी शहरात हायड्रोजनवर 50 ऑटो रिक्षा चालवण्यात येणार होत्या.

असे चर्चेत आले होते प्राध्यापक श्रीवास्तव…

देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी 2003 मध्ये बीएचयूला भेट दिली होती. प्राध्यापक श्रीवास्तव यांनी विकसित केलेल्या हायड्रोजन एनर्जी सेंटर लॅबची पाहाणी केली होती. इतकंच नाही तर कलाम यांनी प्रोटोकॉल तोडून प्रा. श्रीवास्तव यांनी तयार केलेल्या हायड्रोजन कारमध्ये बसून बीएचयूच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर प्राध्यापक श्रीवास्तव चर्चेत आले होते.