नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याच्या विचारात आहेत. अण्णांनी पत्र लिहून मोदी सरकारला तसा इशारा दिला आहे. पत्रातील मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण उपोषणाला बसू असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी रामलीला मैदानावर आंदोलन करून अण्णा हजारे यांनी देशभरात खळबळ उडवून दिली होती. आण्णांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत तख्तपालट झाले, असा आजही अनेकांचा दावा आहे. आण्णांच्या आंदोलनाचा फटका मागच्या वेळी कॉंग्रेस सरकाला बसला होता. या वेळी केंद्रातील भाजप प्रणीत एनडीएचे मोदी सरकार अण्णांच्या रडारवर आहे. ‘देशभरात लोकायुक्तांची अंमलबजावणी व्हावी तसेच, शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात’, अशी अण्णांची मागणी आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी ‘लोकायुक्त आणि शेतकऱ्यांसाठीच्या ‘स्वामिनाथन आयोगा’च्या अहवालाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण उपोषण करणार’, असे म्हटले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, आपण राजधानी दिल्लीत करत असलेल्या उपोषणाच्या तारीख आणि ठिकाणाबाबत लवकरच आपण दुसरे पत्र लिहीणार आहोत, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.

उपोषणामागची भूमिका स्पष्ट करताना ८० वर्षीय अण्णांनी म्हटले आहे की, ‘आपले हे आंदोलन मोदी सरकारविरोधात असणार आहे. सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी या सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी तसेच शेतकऱ्यांबाबत मुद्द्यांची मी गेल्या तीन वर्षांपासून सरकारला आठवण करुन देत आहे. परंतू, सरकारकडून या पत्राला साधे उत्तरही आले नाही की, कोणतीही कारवाई केलेली नाही, अशा स्पष्ट शब्दांत मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी भूमिका मांडली आहे.