Gajanan Maharaj Bavanni: संत दासगणू यांनी बावन्नीतून सांगितला गजानन महाराजांचा जीवनप्रवास

विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची संपूर्ण देशात ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराज यांची समाधी आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

Published: February 22, 2022 8:33 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Gajanan Maharaj Bavanni: संत दासगणू यांनी बावन्नीतून सांगितला गजानन महाराजांचा जीवनप्रवास

Gajanan Maharaj Bavanni : शेगावचा योगीराणा म्हणजेच श्री संत गजानन महाराजांचा 144 वा प्रकटदिन (Gajanan Maharaj Prakatdin) बुधवारी 23 फेब्रुवारी साजरा करण्यात येत आहे. गजानन महाराज प्रकट दिनी शेगावसह (Shegaon) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा उत्साह असतो. यंदा गजानन महाराजांच्या प्रकटदिनी तिथी आणि तारीख एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे यावर्षी गजानन महाराजांच्या प्रकटदिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Also Read:

विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची संपूर्ण देशात ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराज यांची समाधी आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. संत गजानन महाराज यांच्या जीवनप्रवासाबद्दल संत दासगणू महाराज यांनी नोंद करून ठेवली आहे. ती गजानन महाराज बावन्नी म्हणून ओळखली जाते.

गजानन बावन्नी जशी आहे तशी…

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१||
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२||
सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३||
माघ वद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४||
उष्ट्या पत्रावळीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५||
बंकट लालावरी तुझी | कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७||
तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंचवणे | नासवोनी स्वरूपी आणणे ||९||
मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०||
विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११||
मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||
जळत्या पर्यकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||
टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्तची जो होता ||१८||
रामदास रूपे त्याला | दर्शन देवोनी तोषविला ||१९||
सुकलालाची गोमाता | द्वाड बहुत होती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१||
घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२||
दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३||
भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४||
आज्ञा तव शिरसावंद्य | काकही मानती तुज वंद्य ||२५||
विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवऱ्याला ||२६||
पिताम्बराकरवी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८||
सवडद येथील गंगाभारती | थुंकूनी वारिली रक्तपिती ||२९||
पुंडलिकाचे गंडांतर | निष्ठा जाणून केले दूर ||३०||
ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३||
कवर सुताची कांदा भाकर | भक्शिलीस तू प्रेमाखातर ||३४||
नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५||
बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||
बापुना मनी विठ्ठल भक्ती | स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८||
वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०||
देहान्ताच्या नंतरही | कितीजणा अनुभव येई ||४१||
पडत्या मजूरा झेलीयेले | बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||
गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाऊनी गजानना | दुःख तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्तांसी | धावून येतो वेगेसी ||४६||
गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे | करा पाठ बहु भक्तीने ||४८||
विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९||
चिंता साऱ्या दूर करी | संकटातूनी पार करी ||५०||
सदाचार रत सद्भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१||
भक्त बोले जय बोला | गजाननाची जय बोला ||
जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||

अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 22, 2022 8:33 PM IST