Top Recommended Stories

Ganesh Jayanti 2022: गणेश जयंतीनिमित्त लाडक्या बाप्पासाठी तयार करा मोदक, झटपट तयार होतात हे 4 प्रकारचे मोदक!

Ganesh Jayanti 2022: गणेश जयंती स्पेशल अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या चार मोदकांची रेसीपी घ्या जाणून...

Published: February 4, 2022 6:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

modak
modak

Ganesh Jayanti 2022: गणेशभक्त दरवर्षी ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2021) वाट पाहत असतात तसंच काही गणेशभक्त गणेश जयंतीची देखील आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) माघ महिन्यातील (Magh Month) जयंतीला 4 फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरुवात झाली आहे. माघ शुल्क पक्षातील चतुर्थी गणेश जयंती (Ganesh Jayanti 2022) म्हणून साजरी केली जाते. गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशक्त मनोभावाने बाप्पाची पुजा करत असतात. बाप्पासाठी आवडते पदार्थ तयार केले जातात. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक (Modak). घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. उकडीचे आणि तळलेले मोदक सर्व जण तयार करतात. पण हल्ली गृहिणी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आवर्जुन तयार करताना पाहायला मिळतात. उकडीचे आणि तळलेले मोदक तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी खूप पदार्थ देखील लागतात. पण आज आम्ही तुम्हाला गणेश जयंती स्पेशल अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या चार मोदकांची रेसीपी (modak special recipe) सांगणार आहोत. तुम्ही अशाप्रकारचे मोदक तयार करुन बाप्पासाठी नैवेद्य म्हणून ठेवू शकता.

Also Read:

मावा मोदक (Mava Modak) –

एका कढईमध्ये पाव किलो खवा घ्या. चार ते पाच मिनिटं खवा भाजून घ्या. खवा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग किंवा केशरचे दूध टाका म्हणजे मोदकला चांगला रंग येईल. खवा थंड झाल्यानंतर त्यामध्ये 125 ग्रॅम पीठी साखर आणि वेलची पूड टाका. हे मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यानंतर मोदकाच्या साच्याच्या सहाय्याने मोदक तयार करुन घ्या.

You may like to read

पान मोदक (paan Modak) –

एका कढईमध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट किंवा ओल्या नारळाचा खव किंवा सुख्या खोबऱ्याचा किस घ्या. त्यामध्ये तीन चमचे दूध, एक चमचा साजूक तूप आणि पाव कप खस सीरप टाका. (खस सीरप नसेल वापराचे तर तुम्ही सात ते आठ खायची पानं घ्या. देठ काढून त्याचे बारीक तुकडे करा. मिक्सरमध्ये दूध, पानाचे तुकडे आणि थोडी साखर टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या.) पाच मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित कढईमध्ये गरम करुन घ्या. ड्रायफ्रूट मिक्स असलेले गुलकंद घ्या. त्यामध्ये एक चमचा डेसिकेटेड कोकोनट, टूटी फ्रुटी, भाजलेली बडीशेप, वेलची पूड टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या. गोड पानात असलेल्या मसल्यासारखा तयार हा मसाला होईल. मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये तुम्ही मोदकासाठी तयार केलेले मिश्रण टाका. त्यामध्ये पानाचे स्टफिंग टाकून मोदक तयार करा. हे मोदक खायला खूप चविष्ट लागतात.

पंचखाद्य मोदक (Panchkhadya Modak) –

कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकून हलकी भाजून घ्यायची. खसखसला हलका सोनेरी रंग आल्यानंतर त्यामध्ये एक कप खजूरचे तुकडे टाका. तुपामध्ये खजूर व्यवस्थित भाजून घ्या. त्यामध्ये सुका मेवा, पाव कप डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पूड टाकून एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिश्रण हालवून घ्या. गॅस बंद करुन मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण टाकून मोदक तयार करुन घ्या. जर तुम्हाला टूटी फ्रुटी आवडत असेल तर ती देखील या मोदकामध्ये टाकू शकता.

काजू मोदक (kaju Modak)-

काजू मोदक तयार करण्यासाठी एक कप म्हणजे 100 ग्रॅम काजू घ्या. त्याचे तुकडे करुन मिक्सरमधून पूड तयार करुन घ्या. गॅसवर तवा गरम करुन घ्या आणि गॅस बंद करा. या तव्यावर काजूची पूड टाका. त्यामध्ये शंभर ग्रॅम आयसिंग शूगर आणि पाव कप मिल्क पावडर टाका. तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करुन घ्या. त्यानंतर गॅस सुरु करुन एक मिनिटं सर्व मिश्रण भाजून घ्या. पण एका गोष्टीची काळजी घ्या की या मिश्रणाला पाणी सुटले नाही पाहिजे. दोन चमचे पाण्यामध्ये दोन थेंब रोज इसेंसचे टाका (पाण्याऐवजी रोज वॉटर घेतले तरी चालेल.) हे पाणी थोडं थोडं करुन मिश्रणामध्ये टाकून त्याचा व्यवस्थित गोळा तयार करा. त्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण टाकून तुम्ही मोदक तयार करु शकता.

(साभार: मधुराज रेसीपी)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 6:00 AM IST