मुंबई : भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केली जाते. त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिका तृतीया (Hartalika Trutiya 2021) असते. यादिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत (Hartalika Trutiya Vrat 2021) करतात. देशातील अनेक राज्यांत हरितालिका व्रत विविध पद्धतीने साजरे केले जाते. यावर्षी 9 सप्टेंबर 2021 रोजी हरितालिका तृतीया साजरी केली (Hartalika Trutiya Vrat Vidhi) जाणार आहे.Also Read - Hartalika Tritiya 2021: पतीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हरितालिकाला करा 'हे' उपाय

हरितालिकेचे व्रत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपती स्थापनेच्या आधी केले जाते. हरितालिका तृतीयाला महादेव आणि पार्वतीची पूजा केल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी काही ठिकाणी प्रथा आहे. हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान आणि दक्षिण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. हरितालिकेला संपूर्ण दिवस निर्जळी उपास करून दुसऱ्या दिवशी व्रत पारण केले जाते.

​हरितालिका पूजाविधी (Hartalika Vrut Vidhi)

हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात. या दिवशी सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात. या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत पारण केले जाते.

​हरितालिकेची पौराणिक कथा (Story of Hartalika)

पौराणिक अख्यायिकेनुसार, हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाली आणि नारदाच्या सांगण्यावरून पर्वतराजाने तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचे ठरवले. मात्र पार्वतीच्या मनात भगवान शंकर असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला. तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन असे तिने सांगितले. तसेच आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली आणि शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन कठोर तपस्या केली. सलग 12 वर्षे पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.