Makar Sankrant Special Recipe: भोगीनिमित्त तयार करा चविष्ट भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी; जाणून घ्या सोपी रेसिपी!
Makar Sankrant Special Recipe: भोगीनिमित्त खास भाजी तयार केली जाते. या भाजीला खूप महत्व असते. वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्यांची ही भाजी तयार केली जाते.

Makar Sankrant Special Recipe: मकर संक्रांत सण जवळ आला आहे. हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असतो. मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. भोगीनिमित्त खास भाजी तयार केली जाते. या भाजीला खूप महत्व असते. वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्यांची ही भाजी तयार केली जाते. ही पोष्टीक आणि स्वादिष्ट भोगीची भाजी कशी तयार करायची त्याचसोबत बाजरीची भाकरी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत…..
Also Read:
- Natural Instant Energy Drinks: तात्काळ उर्जेसाठी प्या हे नैसर्गिक ड्रिंक्स, आळस आणि थकवा होईल दूर
- Pistachios Benefits : डायबिटीजच्या रुग्णांनी रोज करावे पिस्त्याचे सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे!
- Makar Sankranti 2022 Special Recipe: संक्रांतीनिमित्त तयार करा पारंपारिक तीळगुळाची पोळी, जाणून घ्या रेपीसी!
भोगीची भाजी –
भोगीच्या भाजीसाठीचे साहित्य –
– दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे
– एक मोठा चमचा पांढरे तीळ
– एक चमचा किसलेले ओले खोबरे
– एक चमचा तेल
– अर्धा चमचा जीरे
– गोडा मसाला
– धने पूड
– लाल तिखट
– भाज्या : बटाट्याचे तुकडे, मटार, हरभरा, वाल पापडी, गाजराचे तुकडे, वांगं, शेवग्याची शेंग
– बोराचे तुकडे
– एक चमचा चिंचेचा कोळ
– एक तुकडा गूळ
– मीठ
अशी तयार करा भोगीची भाजी –
एका कढईमध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या, त्यानंतर याच कढईमध्ये तीळ आणि त्यानंतर किसलेले खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. मिक्सरमध्ये पाणी टाकून शेंगदाणे, खोबरे आणि तीळाची व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करुन घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाका. या तेलामध्ये अर्धा चमचा जीरे टाका. जीरे व्यवस्थित तडतडल्यानंतर गॅस मंद आचेवर करा आणि त्यामध्ये शेंगदाणे-तीळ-खोबऱ्याची पेस्ट टाका. दोन ते तीन मिनिटं पेस्ट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गोडा मसला किंवा गरम मसाला, धणे पूड, लाल तिखट टाका. हे सर्व मसाले दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये बटाट्याचे तुकडे, मटार, हरभरा, वाल पापडी, गाजरचे तुकडे या सर्व भाज्या टाकायच्या. या भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाका. या भाज्या थोड्याश्या शिजायला लागल्यानंतर त्यामध्ये वांग, शेवग्याची शेंग टाकायची. कारण वांग- शेवग्याची शेंग लवकर शिजते त्यामुळे त्या नंतर टाकायच्या. झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये बोराचे तुकडे देखील तुम्ही टाकू शकता त्यामुळे भाजी चविष्ट लागते. त्यानंतर यामध्ये एक चमचा चिंचेचा कोळ, थोडासा गूळ आणि चवीसाठी मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्या. पाच ते सात मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. अशाप्रकारे भोगीची खमंग भाजी तयार होईल.
बाजरीची भाकरी –
बाजरीच्या भाकरीसाठी साहित्य –
– दोन कप बाजरीचे पीठ
– पाणी
– चवीपूरते मीठ
– पांढरे तीळ
अशी तयार करा बाजरीची भाकरी –
एका परातीमध्ये बाजरीचे पीठ घ्या. त्यात मीठ टाका. थोडं थोडं पाणी टाकून तीन ते चार मिनिटं हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. या पीठाचे भाकरी तयार करण्यासाठी गोळे तयार करुन घ्या. पोळपाट घेऊन त्यावर थोडसं कोरडं बाजरीचे पीठ टाका आणि पीठाचा गोळा ठेवून भाकरी थापून घ्या. त्यानंतर या भाकरीवर तुम्ही पांढरे तीळ सर्वबाजूला पसरवून दाबून घ्या. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तव्यामध्ये तीळ लावलेली भाकरीची बाजू खालच्या बाजूला टाका. भाकरीला पाणी लावून घ्या. भाकरी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. अशाप्रकारे आपली तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार होईल. भोगीच्या भाजीसोबत तुम्ही ही भाकरी खाऊ शकता.
सौजन्य: मधुराज रेसिपी.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या