Makar Sankrant Special Recipe: संक्रांतीनिमित्त तिळापासून तयार करा लाडू, वडी, पापडी; जाणून घ्या झटपट रेसिपी!

Makar Sankrant Special Recipe: संक्रांतीला तिळाचे लाडू देण्याची एक पद्धत आहे. पण हल्ली संक्रांतीनिमित्त तिळापासून वेगवेगळे पदार्थ देखील तयार केले जातात.

Published: January 12, 2022 4:18 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Tilache ladoo adn papadi
Tilache ladoo adn papadi

Makar Sankrant Special Recipe: मकर संक्रांत सण जवळ आला आहे. संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू आलेच. सगळीकडे घरोघरी संक्रांतीनिमित्त लाडू तयार करण्याची लगबग सुरु आहे. संक्रांतीला तिळाचे लाडू देण्याची एक पद्धत आहे. पण हल्ली संक्रांतीनिमित्त तिळापासून वेगवेगळे पदार्थ देखील तयार केले जातात. आज आपण संक्राती स्पेशल तिळापासून झटपट खमंग असे लाडू, पापडी आणि वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत….

Also Read:

तिळाचे लाडू –

तिळाचे लाडू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

– 3/4 कप पांढरे तीळ
– 1/2 कप साधा गूळ किंवा चिक्कीचा गूळ
– पाव कप शेंगदाणा कूट
– अर्धा चमचा वेलची पूड
– एक चमचा दूध
– एक चमचा साजूक तूप

असे तयार करा तिळाचे लाडू –

कढईमध्ये तीळ टाकून मध्यम आचेवर ते भाजून घ्या. एकसारखे सोनेरी रंग येईपर्यंत तीळ खरपूस भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये गूळ टाका. तीन ते चार मिनिटं गूळ व्यवस्थित वितळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा दूध टाकून व्यवस्थित मिश्रण हालवून घ्या. दोन ते तीन मिनिटांनी गॅस बंद करा. त्यामध्ये वेलची पूड, तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाका. हे मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यानंतर तळहाताला तूप लावून घ्या. चमचाभर तिळाचे मिश्रण घेऊन त्याचे व्यवस्थित लाडू वळून घ्या. अशाप्रकारे खमंग तीळाचे लाडू तयार होतील.

तिळाची वडी –

तिळाची वडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

– 3/4 कप तीळ
– अर्धा कप साधा गूळ आणि अर्धा कप चिक्कीचा गूळ
– एक पाव कप सुखे किसलेले खोबरे
– पाव कप शेंगदाण्याच्या कूट
– वेचली पूड
– जायफळ पूड-
– तूप

अशी तयार करा तिळाची वडी-

कढईमध्ये तीळ टाकून ते व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. हे तीळ ताटामध्ये काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप गरम करुन घ्या त्यामध्ये दोन्ही प्रकारचे गूळ घाला. गूळ फक्त वितळवून घ्या. त्याचा पाक तयार करु नाही. गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ, खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचा कूट, वेलची पूड आणि जायफळ पूड टाकायची आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. एका स्टीलच्या ताटाला तूप लावून घ्या आणि त्यावर तिळाचे मिश्रण टाकून ते ताटावर पसरवा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर चाकूने त्याच्या वड्या करुन घ्या. अशाप्रकारे तयार होतील तिळाच्या वड्या ज्या खायला खूपच चविष्ट लागतात.

तीळ पापडी –

तीळ पापडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

– एक कप पांढरे तीळ
– 3/4 कप साखर
– वेलची पूड
– जायफळ पूड

अशी तयार करा तीळ पापडी –

गॅसवर तवा ठेवू त्यामध्ये तीळ टाकून मध्यम आचेवर ते खरपूस भाजून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत तीळ चांगले भाजून घ्या. हे तीळ एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर कॅरमल तयार करण्यासाठी तव्यामध्ये 3/4 कप साखर टाका. सतत साखर हलवत राहा. साखर सोनेरी रंग येईपर्यंत हलवत राहा. जास्त वेळ साखर गरम करायची नाही. यामध्येच वेलची पूड आणि थोडसं जायफळ टाका. त्यानंतर या मिश्रणामध्ये भाजलेले तीळ टाकून व्यवस्थित ते हालवा. आता वॅक्स पेपर घेऊन एका चमच्याच्या सहाय्याने तिळाच्या मिश्रणाचा गोळा वॅक्स पेपरवर ठेवा. वॅक्स पेपरवर आधी तुम्ही तूप लावा त्यानंतर तिळाचा गोळा ठेवून लाटण्याच्या सहाय्याने पापडी लाटा. मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे तीळ पापडी लाटायचे आहे. अशाप्रकारे कुरकुरीत तीळ पापडी तयार होतील.

सौजन्य: मधुराज रेसिपी.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 4:18 PM IST