मुंबई : मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने 15 जणांचा बळी घेतला आहे.  या पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. चेंबूरच्या भारतनगर भागामध्ये घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत 16 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर एनडीआरएफच्या पथकामार्फत बचावकार्य सुरु आहे. तर विक्रोळीमध्ये घर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आणि भांडूपमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.Also Read - Maharashtra Flood Update: राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूंचा आकडा 82 वर, 59 जण अद्याप बेपत्ता, मदतकार्य सुरू

भारतनगर भागामध्ये रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरड काही घरांवर कोसळली. रात्रीच्या वेळी सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. दरड घरांवर कोसळू नये यासाठी याठिकाणी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. मलब्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पण पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. Also Read - तळीये दुर्घटना! आतापर्यंत 44 जणांचे मृतदेह काढले बाहेर, अनेक जण ढीगाऱ्याखाली अडकले

Also Read - दु:खाची दरड! कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर , दरड कोसळून 61 जणांचा मृत्यू

मुंबईच्या विकोळी परिसरात दुमजली घर कोसळून 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विक्रोळीच्या सूर्यनगरमध्ये ही घटना घडली आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पावसामुळे मुंबईत झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना  2 लाखांची आणि जखमींसाठी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनांप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. तर जखमींवर राज्य सरकारमार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची झोपमोड केली. मुंबईसह उपनगरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. या पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढले. दादर, माटुंगा, सायनसह बोरीवली, दहिसर, सांताक्रुझ, अंधेरी याठिकाणी सखल भागात पाणी साचले. काही भागामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबत वाहने देखील वाहून गेली. मुंबईला पुढचे काही तास महत्वाचे आहेत. येत्या काही तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.