मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘ज्ञान दिवस’ म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षांची आंबेडकरी अनुयायांची मागणी आज पूर्ण झाल्याबद्दल खूप समाधान वाटत असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विविध विषयांचा मोठा व्यासंग होता. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी परदेशात जाऊन सखोल अभ्यास केला. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम. एस. सी. ची पदवी मिळविली होती. ग्रेज इन (लंडन) या संस्थेतून त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ ची पदवी तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन येथून डी. एस.सी (इकॉनॉमिक्स) ची पदवी संपादन केली. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाचा, प्रज्ञेचा झराच होता. त्यामुळे शासनाने त्यांची जयंती हा ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन कृतज्ञता व्यक्त केली असल्याचं राजकुमार बडोले म्हणाले.

(हे पण पाहा: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार!)

न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाने त्यांना एल. एल. डी. पदवी प्रदान केली तर हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. त्यांची ग्रंथसंपदा, विविध विषयांवर लिहिलेले महत्वाचे ग्रंथ, साप्ताहिके, पाक्षिके, दैनिके यातून केलेले लेखन, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकिय कार्ये असे उत्तुंग कार्य पाहता त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख पटते. त्यामुळेच त्यांच्या प्रज्ञेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी देशाला महान लोकशाही संविधान देऊन विभाजित समाजाला एका समानतेच्या धाग्यात बांधले. त्यांच्या दूरदर्शीपणामुळेच आज देशाची प्रगती होत आहे. महाराष्ट्र राज्याने त्यांच्या जयंतीदिनी ज्ञान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन त्यांना मानवंदना दिली आहे, अशा शब्दात राजकुमार बडोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर तसेच विविधांगी पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या ‘महामानव: आपला आदर्श, आपली प्रेरणा’ हे पुस्तक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केले आहे. शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकात वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.