सातारा – थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. मात्र, आता हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. भिलार वासियांनी यानिमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन गुरूवारी भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी याठिकाणी येऊन कार्यक्रम घडवून आणावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

देशातील पहिले पुस्तकाचे गाव ही आगळी-वेगळी सुंदर संकल्पना राबवून ती कार्यान्वित केल्याबद्दल मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे व भिलार गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, भिलारने देशात या निमित्ताने वेगळा इतिहास रचला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे वाचन संस्कृती कमी होते की काय? अशी भीती व्यक्त होत असताना, भिलार वासियांनी “नाही.. आपल्याला वाचन संस्कृती ही पूर्वजाने दिलेली आहे. ती कमी होऊ देणार नाही” असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.

गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक गावात आले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळीने गाव सजल्याचं पहायला मिळालं. भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे. जो कोणी गावात येईल, तो या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त केला. या गावातील प्रत्येक घर सदासर्वकाळ पुस्तकाचे घर असणार आहे. या गावातल्या लोकांनी पुस्तकालाच आपले कुटुंब मानले आहे. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने’ याचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आपल्या कृतीतून दाखविला आहे. (संबंधित बातमी: महाराष्ट्रात साकारतंय देशातील पहिलं ‘पुस्तकांच गाव’)

याठिकाणी येणाऱ्यांसाठी यापुढे स्ट्रॉबेरीची चव व वाचनाची भूक भागविण्याची नामी संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात वाचन संकृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यकांनी वेळोवेळी केली आहे.

आपण खूप काही करतो पण डॉक्युमेंटेशनमध्ये कमी पडतो. तेव्हा यापुढे यादृष्टीने देखील आपण प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून, वाचन संस्कृती जपून ठेवल्यास येणाऱ्या पिढीसाठी ते पोषक असणार आहे. पुस्तकाच्या भिलार या गावात सर्वच प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकांना निखळ आनंद मिळेल आणि जाताना तो काहीतरी ठेवा घेऊन जात आहे.

याठिकाणी देश-विदेशातील साहित्य देखील उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील मुलांची सृजनशीलता वाढावी यासाठी सहलीचे नियोजनदेखील केले जाईल. मुलं या गावात येतील. इथली साहित्य व संस्कृती सोबत घेऊन जातील, अशी अपेक्षा विनोद तावडे यांनी व्यक्त केली. आता स्ट्रॉबेरीबरोबरही पुस्तकेही या गावात राहील. येणा-या पर्यटकांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.