Top Recommended Stories

Maratha Reservation : मराठा समाज्याच्या मागण्या मान्य, संभाजीराजे भोसलेंनी उपोषण सोडलं!

Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला.

Updated: February 28, 2022 8:38 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

sambhajiraje bhosale taken back hunger strike
sambhajiraje bhosale taken back hunger strike

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणावर (Hunger Strike) बसलेल्या खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhajiraje Bhosale) यांनी उपोषण सोडले आहे. आझाद मैदानावर ते उपोषणासाठी बसले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Saiyogitaraje Chatrapati) या देखील उपोषणाला बसल्या होत्या. अखेर तिसऱ्या दिवशी मागण्या मान्य झाल्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी एका लहान मुलाच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडले.

Also Read:

संभाजीराजे भोसले उपोषणाला बसलेल्या आझाद मैदानावर (Azad Maidan) सरकारच्या (Maharashtra Government) वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Minister Ekanath Shinde), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dipil Walase-Patil) हे चर्चेसाठी आले होते. चर्चेनंतर राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर संभाजीराजेंनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्यावतीने चर्चेसाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या वाचून दाखवल्या. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभाजीराजेंनी मराठा समाजासाठी मोठा लढा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्व मागण्यांची तारीखनिहाय पूर्तता होणार असल्याचे देखील सांगितलं.

You may like to read

राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी उपोषण स्थळी एका लहान मुलीच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. तसंच त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना देखील संभाजीराजेंच्या हातून ज्यूस प्यायलानंतर उपोषण सोडले. यावेळी सरकारच्या वतीने आलेल्या एकनाथ शिंदे आणि दिलीप वळसे पाटील यांनी देखील संभाजीराजे भोसले यांना ज्यूस प्यायला दिला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला.

सरकारने मराठा समाजाच्या या मागण्या केल्या मान्य –

– मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणातंर्गत 9 सप्टेंबर 2020 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण कोर्टाच्या निर्णयानंतर या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. दरम्यान या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

– मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करणार.

– सार्थीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.

– सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.

– सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.

– आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी रुपये दिले असून आणखी 20 कोटी रुपये आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी रुपये निधी देणार.

– मराठा समाजातील बांधवांना व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत. तसंच परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवीन पॉलिसी ठरवू. तसंच कर्जाची मुदत 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे.

– आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासह इतर संस्थासाठी पूर्णवेळ महासंचालक, तसंच इतर कर्मचारी पदांवरही नियुक्ती करु.

– विविध जिल्ह्यात स्थापन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाची यादी मागवून त्याचा पाठपुरावा करु. तसंच सद्यस्थितीला तयार वसतिगृहाचं गुढीपाढव्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करु.

– कोपर्डी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना सूचना करणार.

– मराठा आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक घेऊ. प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येईल.

– मराठा आंदोलनात मृत आंदोलकांच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. कागदपत्र पूर्तता करुन योग्य निर्णय घेऊ.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 8:38 PM IST

Updated Date: February 28, 2022 8:38 PM IST