Marathi Bhasha Din 2022: 'कुसुमाग्रज' यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?, एका क्लिकवर घ्या जाणून!
Marathi Bhasha Din 2022 : आपल्या महाराष्ट्राचे जेष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

Marathi Bhasha Din 2022 : आज मराठी भाषा दिन (Marathi Bhasha Din 2022) असून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा (Marathi Bhasha) खूप अभिमान आहे. आपल्या महाराष्ट्राचे जेष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirvadkar) उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन (Marathi Rajbhasha Din) म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या मराठी भाषेच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन आणि मराठी भाषेचा गौरव म्हणून दरवर्षी ‘मराठी भाषा दिन’ (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांचे मूळ नाव होते गजानन –
विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार आणि समीक्षक होते. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यामध्ये झाला होता. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर त्यांनी त्याना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले होते.
असं पडलं कुसुमाग्रज नाव –
कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे टोपणनाव त्यांनी धारण केले होते. तेव्हापासून विष्णू वामन शिरवाडकर हे कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. कुसुमाग्रज यांनी आपले शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामं केली होती. तसंच त्यांनी ‘स्वराज्य’, ‘प्रभात’, ‘नवयुग’, ‘धनुर्धारी’ अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून देखील काम केले होते.
भालेरावांना नाटक लिहिण्यास केले प्रवृत्त –
मराठीवर आणि लिखाणावर प्रेम असणारे कुसुमाग्रज ज्यावेळी पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आले त्यावेळी त्यांची भेट मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव यांच्याशी झाली. मराठी साहित्याची होणारी दूरवस्था त्यांना सांगून कुसुमाग्रजांकडून त्यांनी दर्जेदार साहित्य निर्मितीला प्रेरणा दिली. त्यांनीच शिरवाडकरांना नाटके लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. त्यातून प्रेरणा घेतच ते एक उत्तम नाटककार म्हणून नावारुपाला आले.
अन् कुसुमाग्रज असे झाले नाटककार –
फक्त कवी असलेले वि. वा शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. एक नाटककारपेक्षा ते कवी म्हणून अधिक नावारुपाला आले होते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते. कुसुमाग्रज यांचे कुसुमाग्रज नावाने काव्यलेखन आहे. तसंच जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटकं आहेत.