By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Menstrual Hygiene Day : राज्य सरकारची मोठी घोषणा, महिलांना फक्त 1 रुपयांमध्ये देणार 10 सॅनिटरी नॅपकिन
Menstrual Hygiene Day : राज्य सरकारची ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. या योजनेमुळे महिलांचे आरोग्य देखील चांगले राहणार आहे.

Menstrual Hygiene Day : ‘वर्ल्ड मेन्सट्रुअल हाइजीन डे’ म्हणजेच ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ (World Menstrual Hygiene Day 2022) या दिवसी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन (Sanitary napkin) देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी आज कोल्हापूरात (kolhapur) याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्व महिला वर्गाकडून स्वागत केले जात आहे.
Also Read:
राज्य सरकारची ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यू मागे हे सर्वात मोठे कारण असून हा प्रश्न कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी नाममात्र रुपयांमध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे.’
दारिद्र रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी ही योजना असणार आहे. सध्या महाराष्ट्रात राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत दारिद्र्य रेषेखालील सर्व युवती आणि महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आणि बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
या योजनेची वैशिष्ट्ये –
– राज्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिला आणि आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतील सर्व महिला वगळून इतर दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती आणि महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात 10 सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट मिळणार आहे.
– स्थानिक पातळीवर गाव स्तरावरच गावातील ग्राम संघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.
– शासन स्तरावर दर करार करण्यात येणार आहे.
– योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नॅपकिन किटचा वापर करण्याबाबत वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जनजागृती आणि प्रचार करण्यात येणार आहे.
– या योजनेत जवळपास 60 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन मार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावावी यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत.
– सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारी ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून, शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे.