मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा ओला ड्रायव्हर विरोधात महिलेची तक्रार समोर आली आहे. ओला ड्रायव्हरने अश्लील चाळे केल्याचा आरोप एका तरूणीने केला असून मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या ड्रायव्हरने अश्लील चाळे करताच तरूणीने तेथून पळ काढला.

30 वर्षीय तरुणी मुळची उत्तर प्रदेशातील गाझियाबादची आहे. ती नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईत आली होती. तरुणीने सोमवारी ‘ओला’च्या अॅपवरुन शेअर टॅक्सी बुक केली. ती अंधेरीहून परेलला जात होती. टॅक्सीत बसताना सहप्रवासी होते, मात्र आपण शिवाजी पार्क परिसरात पोहचलो त्यावेळी टॅक्सीत एकटीच असल्याचं तरुणीने सांगितलं.

‘मी फोनवर बोलत होते. त्याचवेळी चालकाने टॅक्सी थांबवल्याचं माझ्या लक्षात आलं. मी ड्रायव्हरकडे पाहिलं, त्यावेळी त्याने पँटची झिप उघडून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली’ असा आरोपी तरुणीने केला आहे. घाबरल्यामुळे आपण टॅक्सीबाहेर पळ काढला. ओला अॅपवरील नोंदणीकृत क्रमांक आणि मोबाईल नंबरवरुन ड्रायव्हरची ओळख पटली आहे. लवकरच आरोपीला बेड्या ठोकू, असं पोलिसांनी सांगितलं.