मुंबई : असे म्हणतात की, मुंबई २४ तास धावत असते आणि झोपतही नाही. तसचं चित्र आता आपल्याला पहायला मिळणार आहे. कारण, मुंबईतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरु ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे.

मुंबई आस्थापना विधेयक गुरुवारी रात्री विधानसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे मुंबईतील दुकाने २४ तास सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच आता रात्रभर खाण्यापिण्याची मजा खवय्यांना लुटता येणार आहे. तसेच, नोकरदारांनाही याचा मोठा फायदा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसबेत मांडलेल्या विधेयकात दुकाने २४ तास सुरू ठेवण्यासाठी कर्मचा-यांची संख्या, कामाची वेळ तसेच कर्मचा-यांच्या सुविधा यासंदर्भातील तरतुदी आहेत.

या विधेयकानुसार दहापेक्षा कमी कर्मचारी काम करीत असणा-या प्रत्येक आस्थापनेच्या मालकाला व्यवसाय सुरू केल्यावर दोन महिन्यांच्या आत ऑनलाइन अर्ज, कागदपत्र, स्वयं-घोषणापत्र, स्वयंप्रमाणित सादर करून नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
पाहूयात या विधेयकात काय तरतुदी आहेत

  • कोणत्याही कर्मचा-याला ९ तासांपेक्षा जास्त तास काम करण्यास भाग पाडता येणार नाही
  • पाच तासांपेक्षा अधिक तास सलग काम करून घेता येणार नाही. त्याला अर्धा तासाची सुट्टी द्यावी लागेल
  • प्रत्येक कर्मचा-याला एक साप्ताहिक सुट्टी द्यावी लागणार
  • महिला कर्मचा-याच्या वेतनात कोणताही भेदभाव करता येणार नाही
  • रात्री ९.३० नंतर महिला कर्मचा-यांची संमती असेल तरच त्यांना कामावर थांबविता येणार
  • रात्री ९.३० नंतर महिला कर्मचा-यांचे संरक्षण व लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याची तसेच त्यांना निवासस्थानापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था करावी लागणार