मुंबई : मुंबईत महिलांच्या सुरक्षेच्या (Women’s Protection) दृष्टीकोणातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांमार्फत महिलांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. यासाठी मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तैनात केलेल्या मोबाईल व्हॅन्समध्ये एक व्हॅन (Mobile Van) फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. या पथकाला ‘निर्भया पथक’ (Nirbhaya squad) म्हटले जाईल. या पथकात एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाची महिला अधिकारी, एक महिला कॉन्स्टेबल, एक पुरुष कॉन्स्टेबल आणि एक चालक यांचा समावेश असेल. (Mumbai Women’s Protection Cell: Women’s Security Cell to be set up in Mumbai; Nirbhaya squad to run for immediate help!, Mobile Vans)

असे काम करेल निर्भया पथक

 • निर्भया पथकासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक स्वतंत्र डायरी बनवली जाईल. त्यामध्ये सर्व प्रकारचे तपशील नोंदवले जातील. त्यांची नोडल अधिकाऱ्यामांर्फत वेळोवेळी तपासणी केली जाईल.
 • निर्भया पथकात नियुक्ती करण्यात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी विशेष प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून ते हे प्रकरणे हाताळण्यात एक्सपर्ट होतील. या शिवाय ज्या पोलीस स्टेशनच्या परिसरात बालगृह, अनाथालय किंवा महिला PG आहे त्या भागात गस्त घालून गोपनीय माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण देखील या पथकाला दिले जाईल.
 • प्रत्येक पोलीस ठाण्यात अशा ठिकाणांची नोंद केली जाईल ज्या ठिकाणांहून महिलांवरील गुन्ह्यांच्या घटना समोर येतात आणि त्यानुसार पेट्रोलिंग पॅटर्न तयार केला जाईल.
 • झोपडपट्टी, मनोरंजन पार्क, शाळा, महाविद्यालय परिसर, चित्रपटगृहे, मॉल्स, बाजारपेठा, बस स्टँड आणि रेल्वे स्थानके तसेच ज्या ठिकाणी लोकांची वरदळ कमी आहे, अशा ठिकाणांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश केला जाईल.
 • एखादी मुलगी रात्री प्रवास करत असेल आणि तिने मदत मागितली तर तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत केली जाईल.
 • एखादी ज्येष्ठ महिला पोलीस स्टेशनच्या परिसरात एकटी राहत असेल तर गस्त घालताना तिला भेटून तिची विचारपूस केली जाईल.
 • गेल्या 5 वर्षात महिला आणि मुलांवर अत्याचार केलेल्या लोकांची यादी तयार केली जाईल. पोलीस स्टेशनमधून ही यादी घेऊन त्यांच्यावर नजर ठेवली जाईल.

निर्भया पथकावर वरिष्ठ अधिकऱ्यांचे असणार लक्ष

 • अतिरिक्त आयुक्तांना त्यांच्या परिसरात सल्ला शिबिर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी पीडित महिला, पीडित बालकाचे मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाईल.
 • 5 अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरे लावली पाहिजेत.
 • अतिरिक्त आयुक्त स्तरावर आदेश देण्यात आले आहेत की प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिडन (पेन) कॅमेरे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून महिलांची छेड काढणे किंवा पाठलाग करणे अशा प्रकरणांमध्ये पुरावे गोळा करता येतील. दररोज कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणारी सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कॉम्प्यूटरमध्ये सेव्ह केली जाईल.
 • प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्भया पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजावर चर्चा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास त्यात सुधारणा करण्यास देखील सांगण्यात आले आहेत.
 • महिला सुरक्षेसाठी 103 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर केला जातो. ही माहिती शक्य तितक्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी.
 • निर्भया पथकाला आदेश देण्यात आले आहेत की सर्व शाळा, महाविद्यालये आणि महिलांच्या पीजीमध्ये जाऊन तेथील महिलांना त्यांच्या सुरक्षेबाबत प्रशिक्षण द्यावे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी निर्भया बॉक्स ठेवण्यात यावेत ज्यात महिला आपल्या तक्रारी ठेवू शकतील. जे पथक गस्तीवर असेल त्याला तो बॉक्स चेक करावा लागेल आणि तक्रारीवर कारवाई देखील करावी लागेल.
 • मुंबईत प्रत्येक विभागात (एकूण 5 विभाग) एक महिला एसीपी किंवा महिला पोलीस निरीक्षक नेमण्यात येतील.
 • जे निर्भया पथक महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये उत्तम कामगिरी करेल त्यांना मुंबई पोलिस आयुक्तांकडून पुरस्कृत केले जाईल.