मुंबई : मासिक टोलपाससाठी (Toll Monthly Pass) सतत टोलनाक्यावर जाऊन रांगेत उभं राहून तुम्ही कंटाळला असाल. आता तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे तुम्हाला घरबसल्या टोलपास काढता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता आता तुम्हाला घरबसल्या मासिक पास (Toll Naka Monthly Pass) काढता येणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला टोलनाक्यावर जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही.Also Read - National Highwayवरुन प्रवास महागणार, 10 ते 15 टक्क्यांनी टोल टॅक्समध्ये वाढ!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Maharashtra State Transport Corporation) जी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे त्यानुसार, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मासिक टोलपास (Monthly Pass Online) खरेदी करु शकता आणि त्याच वेळी तुम्ही टोलपास ऑनलाईन कार्यन्वित करु शकणार आहात. मुंबई प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड, मुलुंड (एल.बी.एस) आणि दहिसर हे टोलनाके आहेत. या टोलनाक्यावरुन मासिक टोलपास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सोयीसाठी फास्टॅगमध्येच मासिक पासची सुविधा यापूर्वीच महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे.

वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या माध्यमातून पैसे जमा करुन एका टोलनाक्याचा अथवा सर्व टोलनाक्याचा फास्टॅगमध्ये खरेदी आणि त्याचवेळी ऑनलाईन कार्यन्वित (online purchase and activation) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसंच प्रचलित पद्धतीनुसार 3 दिवसात टोल नाक्यावर जावून टोलपास कार्यन्वित करण्याची अट देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने रद्द केली आहे. तसंच वाहनाच्या समोरील काचेवर टोलनाक्याच्या कंत्राटदाराचे कलर स्टीकर लावण्याची अट देखील रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या नवीन सुविधेचा फायदा मुंबईतील जवळपास 25 हजार वाहनधारकांना होणार आहे. पथकर टोलनाक्यावर मासिक टोलपाससाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा (Coronavirus) प्रसार होऊ नये यासाठी महामंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसंच या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त वाहनधारकांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.