परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर ST महामंडळ अॅक्शन मोडमध्ये, 400 खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती करणार
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ST Workers Strike Update : एसटी कामगारांच्या संपामुळे (ST Workers Strike) लालपरी (Lalpari) संकटात आली आहे. या संपामुळे एसटीचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. वारंवार इशारा देऊन देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असून गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा संप सुरु आहे. अशामध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा देत जर ते ऐकत नसतील तर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल असे म्हणाले होते. त्यानुसार आता एसटी महामंडळ (MSRTC) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे.
Also Read:
एसटी महामंडळाच्या या निर्णयानुसार रविवारपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या 8 विभागांत 400 खासगी चालकांची नियुक्ती होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. सुमारे 3 हजारांपर्यंत कंत्राटी चालक भरती करण्याचा विचार एसटी महामंडळाचा असल्याचे देखील सांगितले जात आहे. महामंडळाने एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदारांकडून महामंडळाने अर्जही मागविले आहेत. त्यानुसार महामंडळाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर चार कंत्राटदारांना राज्यातील एसटीच्या आठ विभागांत चालक पुरवण्याचे कामही सोपविले आहे. नागपूर (Nagpur), भंडारा (Bhandara), धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik), ओैरंगाबाद (Aurangabad), पुणे (Pune), सोलापूर (Solapur) या 8 विभागांत 400 खासगी चालकांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजपासून म्हणजेच 9 जानेवारीपासूनच हे चालक नियुक्त करावे, अशा सूचना देखील एसटी महामंडळाकडून कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने (Maharashtra Government) पगारवाढ आणि वेतनवाढ यासंदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचारी (ST Workers) आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. वारंवार इशारा देऊन देखील एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. अशामध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांनी पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकारचे एसटी कामगारांबद्दल जसे दायित्व आहे तसेच दायित्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. त्यासाठी एसटी कामगार ऐकत नसतील तर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. प्रशासन हातावर हात ठेवून बसू शकत नाही, असे म्हणत अनिल परब यांनी पुन्हा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या