Unseasonal Rains Update: बळीराजा संकटात! अवकाळी पावसाने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

हजारो हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाल्यानं बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावासाचा फटका बसल्यामुळे बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.

Published: January 12, 2022 8:36 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

hailstorm and unseasonal rains lashed
hailstorm and unseasonal rains lashed

Unseasonal Rains Update: अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) आणि गारपिटीमुळे (Hailstorm) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाल्यानं बळीराजा (Maharashtra Farmer) पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावासाचा फटका बसल्यामुळे बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.

Also Read:

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटी सुरु आहे. यामुळे जवळपास दोन लाख हेक्टरवरील पिकमालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका विदर्भातील (Vidharbh) जिल्ह्यांना बसला आहे. तर मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांना देखील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. विदर्भात संत्रा, केळी, पपई, ज्वारी, मका, हरभरा आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशामध्ये शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रालयातील सुत्रांनी (Sources of Ministry) दिली आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि पाऊस पडत आहे. तीन दिवसांत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, गहू, हरभरा, कापूस, ज्वारी, केळी, पपई, तूर, कांदा, करडई, मोहरी ही पिके आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 28 आणि 29 डिसेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जालना, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील 60 हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.

दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या पवासामुळे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर जिल्ह्यांतील शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास 1 लाख 40 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती मिळेल आणि त्यानुसार मदत दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 8:36 AM IST