लंडन: आयस्क्रिम खाऊन झाल्यावर त्याचा कोन आपण सर्वच जण खाऊन टाकतो. पण, पाणी पिल्यावर आपण बाटली खातो का? नाही ना. पण, आता यापूढे ती खाल्ली तरी चालेल. हो खरंच. गंमत नाही. बाटल्यामुळे वाढत्या प्रदुषणांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञांनी हा अजब शोध लावला आहे. या शास्त्रज्ञांनी पर्यावरणपूरक बाटली निर्माण केली आहे. जी तुम्ही पाणी पिल्यावर गिळून टाकता येईल.

विशेष म्हणजे ही बाटली सध्याच्या बाटलीसारखी नसून छोट्या गोळ्यासारखी आहे. ती बुडबुड्यासारखी दिसते. ती तोंडात टाकल्यावर फुटते. या गोळ्याला ‘ऊहो’ असे नाव देण्यात आले आहे. स्कीपिंग रॉक्स लॅब या कंपनीने ही बाटली बनविली आहे. या कंपनीचे रॉड्रिगो गार्सिया गोन्साल्वेझ यांनी या बाटलीची माहिती दिली. महासागरांमध्ये वाढणार्‍या सीवीड या वनस्पतीपासून ही बाटली बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सीवीडपासून बनवलेल्या आवरणात कोणत्याही प्रकारचा द्रवपदार्थ राहू शकतो, असे ते म्हणाले.

ऊहोचे आवरण चवहीन असून ते खाता येऊ शकते. परंतु, कोणी ते फेकून दिले, तरी चार आठवड्यांमध्ये त्याचे विघटन होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. सामान्य प्लास्टिकची बाटली विघटित होण्यास 700 वर्षे लागतात. मात्र, असले तरी या बाटलीच्या काही मर्यादा आहेत. ही बाटली पुन्हा-पुन्हा भरता येत नाही. तसेच ती काही दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

दरम्यान, मध्यंतरी  ‘एडिबल’ ताट-वाट्याही तयार करण्यात आल्या होत्या. ज्या जेवन संपल्यावर खाता येऊ शकत होत्या. असे का? तर, त्यामुळे गृहिणींना ताटे-वाट्या घासण्याची कटकट नाही, असा युक्तिवाद करण्यात आला होता. पण, पोटभर जेवन केल्यावर ताट वाट्या खाण्यासाठी लोक आणायचे कोठून हा प्रश्न मात्र या प्रकारानंतर निर्माण झाला होता.