मुंबई: श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीलंकेचा 2014 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा (Lasith Malinga Retired) केली आहे. यासोबतच तो क्रिकेटच्या खेळाच्या सर्व फॉरमॅटमधून (all formats of cricket) निवृत्त झाला आहे. मलिंगाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. मलिंगाने 2011 मध्ये कसोटी आणि 2019 मध्ये वनडे क्रिकेमधून निवृत्ती जाहीर केली होती. यावर्षी जानेवारीमध्ये मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

मलिंगाने (Lasith Malinga) निवृत्तीसंदर्भातील ट्वीट करताना म्हटले की, “मी माझे टी-20 चे शूज उतरवून ठेवत आहे आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे! माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार आणि पुढील काही वर्षांमध्ये युवा क्रिकेटपटूंसोबत माझा अनुभव शेअर करण्यास उत्सुक आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. मी तुमच्या सर्वांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्या टी-20 कारकिर्दीत मला पाठिंबा दिला. आज मी माझ्या टी-20 गोलंदाजीला 100 टक्के विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मी श्रीलंका क्रिकेट बोर्ड, मुंबई इंडियन्स, मेलबर्न स्टार्स, केंट क्रिकेट क्लब, रंगपूर रायडर्स, गयाना वॉरियर्स, मराठा वॉरियर्स आणि मॉन्ट्रियल टायगर्स यांचे आभार मानू इच्छितो.”

पुढे मलिंगा म्हणाल की, “आता मला माझा अनुभव अशा युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करायचा आहे ज्यांना आपली राष्ट्रीय टीम आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळायचे आहे. माझे खेळावरील प्रेम कधीही कमी होणार नाही. आम्ही आमच्या तरुण खेळाडूंना इतिहास घडवताना पाहण्यास उत्सुक आहोत.” मलिंगा श्रीलंकेसाठी 30 कसोटी सामने, 226 एकदिवसीय आणि 84 टी -20 सामने खेळला आहे.

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या शानदार कारकिर्दीत मलिंगाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 107 विकेट्स घेतल्या आहे. टी-20 मध्ये 5 वेळा 5 विकेट आणि 10 वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रम मलिंगाने केला आहे. पाच आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक घेणारा मलिंगा हा जगातील एकमेव गोलंदाज आहे. यासोबतच त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील सर्वाधिक विकेट्सही घेतल्या आहेत.