कोलंबो : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या दमदार खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज खेळाडू प्रभावित झालेले बघायला मिळतात. वेळोवेळी हे महान खेळाडू विराटच्या आक्रामकतेचं कौतुक करत असतात. आता पुन्हा असाच एक दिग्गज खेळाडू विराट कौतुक करताना थकत नाहीये. विराटचं कौतुक करणा-या महान खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचे महान क्रिकेटपटू अरविंद डि सिलिव्हा यांचा समावेश झाला आहे.

रविवारी भारत-श्रीलंका कसोटी सामन्याच्यावेळी मैदानावर प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अरविंद डि सिलिव्हा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विराटचे कौतुक केले. ‘विराटला मैदानावर खेळताना पाहून मला वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सची आठवण होते. विराट ज्या प्रकारे क्रिकेट खेळतो त्याचा उद्दामपणा, आत्मविश्वास पाहून मला महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स हे आठवतात.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाला कोहली ज्या प्रकारे सामोरा गेला ते कौतुकास्पद आहे. सुनिल गावसकर, कपिल देव त्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आता कोहली त्याच्या काळात भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास डि सिलिव्हा यांनी व्यक्त केला.