बीजिंग : चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसले असून यात १०० जण ठार तर हजारो लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनच्या नैऋत्य भागात हा भूकंप झाला आहे. ६.५ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ९.२० च्या सुमारास हा भूकंप झाला.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या भूकंपात ५ जण ठार झाले आहेत आणि ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील ३० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे शिन्हुआ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र चीनच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आयोगाने भूकंपात १०० पेक्षा अधिक बळी गेल्याची भीती व्यक्त केली आहे.

सिचुआन प्रांतात हा भूकंप झाला असून सुमारे १३ हजार घरांची पडझड झाली आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. २००८ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, २००८मध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदूही याच भागात होता. त्यावेळी ८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊन तब्बत ८७ हजार लोक दगावले होते.