नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या वादानंतर आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चीनी सैन्याने भारतामध्ये घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. चीनचे सैनिक उत्तराखंडमध्ये 1 किमी पर्यंत आत घुसल्याचे वृत्त समोर आलं आहे. सहा दिवसांपूर्वीच म्हणजेच 25 जुलै रोजी चिनी सैन्याने घुसखोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी चिनी सैनिक उत्तराखंडच्या बाराहोटी परिसरात 1 किमी आत घुसले. 25 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ही घटना घडली होती. भारत आणि चीनमध्ये डोक्लाम प्रश्नावरुन प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचं कळतयं.

चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत घुसखोरी केली. मात्र अद्याप केंद्र सरकार किंवा सुरक्षा दलांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये. या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (हे पण पाहा: युद्धास तयार रहा; शी जिनपिंग यांचे सैन्याला आदेश)

1 ऑगस्ट रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा 90 वा स्थापना दिवस आहे. तत्पूर्वी चीनच्या लष्कराने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह शक्तीप्रदर्शन केले. तसेच सैन्याने युद्धासाठी तयार राहावे, असे वक्तव्य चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी केले आहे. हा भारतासाठी एक इशाराच असल्याचं बोललं जात आहे.