मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याचा आपल्या संघटनेच्या नावात बदल करण्याचा मानस आहे.

जमात-उद-दावाचे नाव बदलून ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ असे करण्याचा हाफिज सईदचा प्लॅन आहे. यासाठी त्याने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तानच्या माध्यमातून हाफिज सईद राजकारणात उतरण्याची तयारी करत आहे.

सईद नजरकैदेत असताना पाकिस्तानच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. तर, तहरीक-ए-इन्साफचे इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लिल मेसेज पाठवल्याचे आरोप केले आहेत.

या सर्वांमुळे आता हाफिज सईद याच्या संघटनेकडून ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ या नावाने पक्ष स्थापन करण्यासाठी पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. जर निवडणूक आयोगाने पक्ष स्थापनेची परवानगी दिल्यास हाफिज राजकारणात येऊ शकतो.

हाफिज सईद गेल्या सहा महिन्यांपासून नजरकैदेत आहे. जमात-उद-दावावर कारवाई न केल्यास पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला होता. त्यानंतर हाफिजला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंडही हाच हाफिज सईद आहे. हाफिज सईद याच्यावर कारवाई करण्यासाठी भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नही सुरु आहेत.